Tanuja and associates
A 703 Divya Smit, Next to Blue Empire Complex,
Bandar Pakhadi Road, Kandivli (W), Mumbai, Maharashtra 400 067
India
Welcoming the festival | Tanuja And Associates Blogs

Blogs

Welcoming the festival

स्वागत सणांचे

In Interior / by Tanuja Rane

आली माझ्या घरी हि दिवाळी
सप्तरंगात न्हाऊन आली....
असे गाणे गुणगुणत दिवाळीच्या स्वागताला जेव्हा तुम्ही तयार होता तेव्हा विचार करा की माझे घरही तयार आहे का माझ्यासोबत दिवाळीच्या स्वागताला?
दिवाळी हा आपला वर्षातला सर्वात मोठा सण. हा सण संपुर्ण कुटुंबाला एकत्र आणतो मग ती घरातील साफसफाई असो किंवा एकत्र बसुन फराळ तयार करणे असो. असं म्हटलं जात की दिवाळी हा रोषणाई, उल्हास, प्रेमाने भरलेल्या नात्यांचा, मैत्रीचा आणि मानवतेचा उत्सव आहे.
झगमगत्या दिव्यांच्या रोषणाईने दिवाळीच्या स्वागताला सुरवात होते. निरनिराळ्या आकाराच्या नक्षीदार पणत्या, मातीचे किंवा सिरॅमिकचे दिवे, रंगीबेरंगी आकाशकंदील त्यात भरच घालतात त्यासोबत सुगंधी अत्तराचे डिफ्युजर, सेंटेड कॅंडेलस् किंवा ड्राय फ्लाॅवरस् वापरल्यास घराच्या वातावरणात एक वेगळीच उर्जा निर्माण होते.
दिवाळीच्या स्वागताला दाराला फुलांचे तोरण व दारासमोर रांगोळी काढण्याची परंपरा आहे. रांगोळी फुलांची असो, रागोळीचे रंग वापरुन काढलेली पारंपारीक रांगोळी असो अथवा फर्शीवर अॅक्रीलीक कलर वापरुन काढलेली रांगोळी असो त्यांवर पणत्या व निरनिराळ्या प्रकारचे दिवे वापरुन ती छान सजवतां येते. दाराच्या कोपऱ्यात अथवा रांगोळीच्या मध्यभागी काचेच्या भांड्यात किंवा पितळी ऊर्ली मधे पाण्यात सोडलेले तरंगते दिवे रांगोळीची शोभा अजुनच वाढवतात.
 
 
दिवाळी म्हणजे रंगांचा सण. रंगांची उधळण घरात पसरली की वाटु लागते आपल्या घरी दिवाळी आली. ही रंगांची उधळण तुम्ही तुमच्या घराच्या फर्निशींग मध्ये बदल घडवून आणू शकता, सोफ्याचे फॅब्रीक बदलल्यास किंवा त्यावर कलरफुल कुशंन्स ठेवल्यास तुमचा सोफा लगेच नविन दिसू लागतो. मेन कर्टन बरोबर एखादा कलरफुल शिअर कर्टन वापरल्याने एखाद्या रंगांची भर तुमच्या डेकोरमधे पडते. भिंतीवरील फोटोफ्रेम मधे हल्ली बरेच पर्याय उपलब्ध आहेत, विविध फोटोंचे कोलाज करुन तुम्ही तुमची मुख्य भिंत सजवू  शकता किंवा त्या भिंतीला वाॅलपेपर लावून तुमच्या लिव्हींगरुमचे रुप पालटु शकता. 
डाईनिंग टेबलावर घातलेला पारंपारिक नक्षीदार रनर व त्यांवर मध्यभागी ठेवलेला कॅंडल स्टॅंड अथवा छानसा दिवा दिवाळीच्या फराळाची लज्जत नक्कीच वाढवेल. 
प्रत्येकाच्या घरात एखादा कोपरा असा असतो की त्यात आपण आवडीने आणलेल्या वस्तू मांडून ठेवतो मी त्याला आनंदी कोपरा असे म्हणेन, त्या मांडणीत मोठ्या आकाराची  पारंपरिक मुर्ती, मोठी समई किंवा दिवा समाविष्ट करुन योग्य ती प्रकाश योजना केल्यास हा कोपरा अजुनच आनंदमय व तेजस्वी होऊ शकतो. 
तुमचे घर म्हणजे तुमच्या व्यक्तीमत्वाचा आरसा असतो असे म्हणतात, दिवाळीच्या स्वागतासाठी केलेल्या तयारीमुळे तुमच्या घरात मंगलमय वातावरण निर्माण होईल आणि तुमचे घर ही तुमच्यासारखेच आनंदी होईल.